आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि.: श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथील यात्रेत आयोजित करण्यात आलेल्या श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये कृषि विभागाचा स्टॉल आकर्षण ठरत आहे.
कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागाच्यावतीने पौष्टिक तृणधान्याची ओळख, त्याचे आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्यांनी समृद्ध आदर्श गाव व 'डिजिटल इंडिया, डिजिटल फार्मर' संकल्पना मांडली आहे. कृषी यांत्रिकीकरण, माती परीक्षण, एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे, पॉलिहाऊस, शेडनेट, फळबाग तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, पिक विमा, पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी व पीएम किसान अशा विविध योजनांची प्रत्यक्ष मॉडेल अतिशय कल्पकतेने व शेतकऱ्यांना दृश्य पद्धतीने संदेश देतील अशी साकारण्यात आली आहेत. देखावे पाहण्यासाठी पुसेगाव परिसरातील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या लोकांची गर्दी होत आहे.
या मॉडेलचा उत्कृष्ट व नयनरम्य देखावा खटाव तालुका कृषी विभागाने साकारलेला आहे. खटाव तालुका कृषि अधिकारी विक्रम वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी 7 दिवसांच्या अथक परिश्रमातून हे देखावे साकारले आहेत.
राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे, सातारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, सातारा उपविभागीय कृषि अधिकारी, रमेश देशमुख यांनी प्रदर्शनास भेट देऊन कृषी विभागाच्या देखाव्यांचे विशेष कौतुक केले.
पौष्टिक तृणधान्य, जैविक शेती व बांबू लागवड काळाची गरज बदलते हवामान, विविध पर्यावरणीय समस्या व अलीकडच्या काळात वाढलेली गंभीर मानवी रोगांची समस्या इत्यादींवर मात करण्यासाठी सद्यस्थितीत व येणाऱ्या काळात कृषी विभागाकडून पौष्टिक तृणधान्ये, जैविक शेती व बांबू लागवड इत्यादीचे क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी लागवड तंत्रज्ञानाची माहिती व अनुदान करिता शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन खटाव तालुका कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी केले आहे.