सांगली प्रतिनिधी --
सांगली जिल्हा परिषदेच्या जत तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. समितीही नेमली आहे. त्यानंतर सदर शिक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे, मात्र केवळ बदलीची कारवाई शिस्त लावण्यासाठी योग्य वाटत नाही. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सदरच्या शिक्षकांवर निलंबन अथवा बडतर्फ ची कडक कारवाई करावी अशी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे .
सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे मनोज भिसे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर याप्रकरणाच्या चौकशीला विलंब लावणाऱ्या जत तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच कडक कारवाई व्हावी. जेणेकरून जिल्ह्यात शिक्षकांकडून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत. याबाबत योग्य ती पावले उचलली न गेल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनोज भिसे यांनी दिलाय. यावेळी राजेश शिरटीकर, शुभम साळुंखे आदि उपस्थित होते