मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. 'सन नेटवर्क'ची 'सन मराठी' ही वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयात हात घालते, नात्यांचे महत्त्व कथेच्या माध्यमातून पटवून देते आणि आता मैत्री हा विषय घेऊन ही वाहिनी नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.
'मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते' हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासून 'तुझी माझी जमली जोडी' ही नवीन मालिका 'सन मराठी' वर येत आहे. दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही नवीन जोडी, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री वाटते. नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे आणि मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी त्यांची या मालिकेप्रती आतुरता देखील दाखवली आहे.
खलनायिका किंवा खलनायक यांच्याशिवाय दोन व्यक्तींचं प्रेम किंवा मालिकेची कथा पुढे कशी सरकणार ना... कथेमध्ये ट्विस्ट तर हवाच. तर 'तुझी माझी जमली जोडी' मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.
तर, नक्की पाहा 'तुझी माझी जमली जोडी' येत्या ११ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता फक्त सन मराठी वाहिनी वर.