नांदेड :- मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानुसार मराठी भाषा विभागाने यावर्षी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तसेच त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा करणे अनिवार्य आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये / सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. या पंधरवडयात केलेल्या कार्यक्रमांचे अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.