नांदेड :- जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड व तालुका क्रीडा परिषद, अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्धापूर तालुकास्तरीय हॉलीबॉल व फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मांजरमकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शारदा भवन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.लोकदाजी गोडबोले तसेच सौ.एस.जी. हुस्सेकर उपस्थित होते.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्री.महादेव मांजरमकर यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अधिक वेळ न घालवता मैदानावर प्रत्यक्ष खेळण्याचे आवाहन केले. नियमित खेळामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते, आत्मविश्वास वाढतो तसेच शिस्त, संघभावना, जिद्द व चिकाटी निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळात सातत्याने सराव करून क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे. निरोगी, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी युवा पिढी ही देशाच्या सशक्त भविष्याची आधारशिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गटशिक्षणाधिकारी श्री. लोकडोजी गोडबोले यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. जंक फूडचे सेवन टाळून पौष्टिक व प्रथिनयुक्त आहार घ्यावा, शरीर सुदृढ ठेवावे आणि आपल्या शाळेचे तसेच अर्धापूर तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर यांनी खेळाडूंनी सदैव खिलाडूवृत्ती जपावी, असे सांगितले. केवळ विजय मिळविण्याच्या उद्देशाने नव्हे, तर नियमांचे पालन करून, प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी खेळावे. विजयाचा आनंद आणि पराभवाची खंत या दोन्ही गोष्टी खिलाडूवृत्तीने स्वीकारून त्यातून शिकण्याची वृत्ती खेळाडूंनी अंगीकारावी, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष तथा संयोजक श्री. गुलाबराव मदने यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध खेळांतील उत्कृष्ट क्रीडा कौशल्य पाहता यावे, त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी नियमित सराव करावा आणि आपल्या क्रीडा कौशल्यात सातत्याने विकास करावा, हा स्पर्धांच्या आयोजनामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी भविष्यातही अधिक उत्कृष्ट पद्धतीने क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
हॉलीबॉल व फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने अर्धापूर तालुक्यातील विविध शाळांमधील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मैदानात उत्साह निर्माण केला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सोपान इंगोले, सिद्धोधन हटकर, दत्ता उपरे, हनुमंत अनमुलवार, डी. एम. खुळे, डी. डी. कोम्पलवार, ओम साई पांचाळ, महेश देशमुख, आत्माराम कदम, विजयानंद काळे, लोखंडे यांच्यासह शिक्षक, क्रीडा शिक्षक व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तालुका क्रीडा परिषदेचे संयोजक श्री. गुलाबराव मदने यांनी केले. सूत्रसंचालन श्री. दत्ता उपरे यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. सिद्धोधन हटकर यांनी केले