*१० ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात कोल्हापूर–कलबुर्गी, तर १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर–मुंबई साप्ताहिक स्पेशल*
*गाड्या वेळेवर चालविण्याची, कायमस्वरूपी करण्याची तसेच सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत विस्तारित करण्याची मागणी*
मिरज, दि. २४ सप्टेंबर २०२६ : मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती सदस्य तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन आणि रेल्वे कृती समिती सांगली–मिरज यांच्या सातत्यपूर्ण मागणी व पाठपुराव्याला प्रतिसाद देत १० ऑक्टोबर २०२६ पासून कोल्हापूर–कलबुर्गी विशेष गाडी, तर १५ ऑक्टोबर २०२६ पासून कोल्हापूर–मुंबई (CSMT) साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे. दसरा, दिवाळी व सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या दोन्ही गाड्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
*कोल्हापूर–कलबुर्गी विशेष गाडी शुक्रवार वगळता दररोज*
गाडी क्र. 01451 कोल्हापूर–कलबुर्गी स्पेशल ही १० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे. कोल्हापूर येथून ही गाडी सकाळी ६.१० वाजता सुटेल. मिरज येथे सकाळी ७.३० वाजता आगमन होऊन ७.५० वाजता पुढे रवाना होईल आणि कलबुर्गी येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल.
या गाडीला हातकणंगले, जयसिंगपूर, आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगारपेठ, ढालगाव, म्हसोबा डोंगर, जावळा, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डूवाडी, सोलापूर आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार अक्कलकोट व गाणगापूर येथेही थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01452 कलबुर्गी–कोल्हापूर स्पेशल कलबुर्गी येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटेल. ही गाडी मिरज येथे पहाटे ३.०० वाजता पोहोचून ३.२५ वाजता पुढे रवाना होईल आणि कोल्हापूर येथे पहाटे ५.४० वाजता पोहोचेल.
ही सेवा सध्या १५ नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मात्र २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीची यात्रा असल्याने त्या काळातही भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे या गाडीची सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावी आणि त्यानंतर ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
*कोल्हापूर–मुंबई साप्ताहिक स्पेशल*
दरम्यान, गाडी क्र. 01418 कोल्हापूर–मुंबई CSMT स्पेशल ही १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे. कोल्हापूर येथून गुरुवारी रात्री १२.०५ वाजता गाडी सुटेल. मिरज येथे रात्री १.५० वाजता आगमन होऊन १.५५ वाजता पुढे रवाना होईल आणि मुंबई CSMT येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला हातकणंगले, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01417 CSMT मुंबई–कोल्हापूर स्पेशल गुरुवारी दुपारी २.३० वाजता CSMT येथून सुटेल. त्यानंतर पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज मार्गे ही गाडी शुक्रवारी पहाटे ४.२० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
*सह्याद्री एक्सप्रेस २० ऑक्टोबरपासून नियमित; मुंबईपर्यंत विस्ताराची मागणी*
दरम्यान, कोल्हापूर–पुणे–कोल्हापूर मार्गावर सध्या सुरू असलेली विशेष सह्याद्री एक्सप्रेस २० ऑक्टोबर २०२६ पासून नियमित करण्यात येत आहे. या गाडीला नवीन क्रमांक 11419 (कोल्हापूर–पुणे) आणि 11420 (पुणे–कोल्हापूर) देण्यात येणार असून, नवीन क्रमांक व सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नियमित धावणार आहे.
सह्याद्री एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा तसेच पुणे परिसरातील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे या गाडीचा पुण्यापुढे मुंबईपर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती सदस्य तसेच रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.
11419/11420 सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबई CSMTपर्यंत विस्तार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, तसेच कोल्हापूर–सांगली–मिरज–कराड–सातारा परिसरातील प्रवाशांना मोठी सोय होणार असल्याचे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
*दोन्ही विशेष गाड्या वेळेवर चालविण्याची मागणी*
दसरा, दिवाळी आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता या दोन्ही विशेष गाड्या वेळापत्रकानुसार नियमितपणे आणि वेळेवर चालविण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच या गाड्यांना कायमस्वरूपी सेवेत रूपांतर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रवाशांनी या दोन्ही विशेष गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात त्यांची सेवा पुढे सुरू ठेवण्यास तसेच कायमस्वरूपी करण्यास मदत होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मुंबई प्रादेशिक सल्लागार समिती सदस्य श्री. किशोर भोरावत, श्री. सुकुमार पाटील, तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंडितराव कराडे (तात्या), ज्ञानेश्वर पोतदार, सोपान भोरावत, वाय. सी. कुलकर्णी, मधुकर साळुंखे, पांडूरंग लोहार आदींनी या मागण्यांसाठी पाठपुरावा केला असून, कोल्हापूर–कलबुर्गी व कोल्हापूर–मुंबई विशेष गाड्या कायमस्वरूपी करण्याबरोबरच 11419/11420 सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.