हिंदू लिंगायत’ समाजाचा अमृत संस्थेत समावेश; विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवा संघटनेच्या पाठपुराव्याला यश; प्रा. मनोहर धोंडे यांची लातूर येथे पत्रकार परिषदेत माहिती

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 23/09/2026 2:54 PM


      महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लाभार्थी यादीत आता ‘हिंदू लिंगायत’ आणि ‘वीरशैव लिंगायत’ या दोन जातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या या समाजघटकातील विद्यार्थी, युवक व नागरिकांना अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. पात्र समाजबांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.

लातूर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. मनोहर धोंडे बोलत होते. यावेळी त्यांनी अमृत संस्थेची स्थापना, तिच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा अमृतमध्ये समावेश करण्यासाठी शिवा संघटनेने केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रवर्गांसाठी स्वतंत्र संस्था कार्यरत आहेत. अनुसूचित जमातींसाठी टीआरटीआय, अनुसूचित जातींसाठी बार्टी, ओबीसी प्रवर्गासाठी महाज्योती तसेच लिंगायत समाजातील पात्र घटकांसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, आरक्षणाच्या कोणत्याही प्रवर्गात समावेश नसलेल्या खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी अमृत संस्था कार्यरत आहे.

अमृत संस्थेची स्थापना २२ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आली असून प्रत्यक्ष कामकाजाला २०२३ पासून सुरुवात झाली. यापूर्वी अमृतच्या लाभार्थी यादीत २२ जातींचा समावेश होता. महाराष्ट्रातील अनेक हिंदू लिंगायत व विरशैव लिंगायत समाजबांधवांच्या शैक्षणिक दाखल्यावर संबंधित जात नमूद असतानाही त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने महाज्योती किंवा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर हिंदू लिंगायत व विरशैव लिंगायत या समाजघटकांचा अमृतमध्ये समावेश करावा, अशी मागणी शिवा संघटनेने शासनाकडे सातत्याने केली. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर २० ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय काढून हिंदू लिंगायत आणि विरशैव लिंगायत या दोन जातींचा अमृतच्या लाभार्थी यादीत समावेश करण्यात आला, अशी माहिती प्रा. धोंडे यांनी दिली.

उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य

अमृतच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी, एम्स यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजनांच्या निकषानुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. काही योजनांमध्ये ५० लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्जाची तरतूद असल्याचे प्रा. धोंडे यांनी सांगितले.

याशिवाय यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आर्थिक सहाय्याच्या योजना उपलब्ध आहेत. तसेच तांत्रिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कौशल्यविकास, स्टार्टअप व उद्योजकतेशी संबंधित विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येतो. अमृतच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक प्रकारच्या योजना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या हिंदू लिंगायत व विरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी अमृतच्या योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.
या पत्रकार परिषदेस शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, लातूर जिल्हाध्यक्ष विलास खिंडे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मुळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवहार वाडकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील शिवा संघटनेचे विविध पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष विलास खिंडे यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या