खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे अमृत संस्थेमार्फत 8 एप्रिलपासून सर्वेक्षण

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/04/2026 7:38 PM

नांदेड :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राज्यभर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून, नांदेड जिल्हयात ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. 
अमृतच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश करण्यात आला असून, सर्वेक्षणाअंती या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.
संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वयोगटातील लाभार्थ्यांसाठी मूल्यवर्धित योजना तयार करण्याचा मानस आहे.
या पार्श्वभूमीवर लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे तसेच उपलब्ध स्थानिक संसाधने, कौशल्य व आवडीच्या आधारे योजना आखण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण दि. ८ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार असून, आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येईल.
 
अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनाल रोड, तरोडा नाका नांदेड येथे संपर्क साधावा. असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या