चार महिन्यांचे वेतन थकीत; जलजीवन व स्वच्छ भारत कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा काळ्या फिती लावून निषेध; 25 एप्रिलनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/04/2026 7:28 PM

नांदेड -  जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने राज्यभरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
     राज्यातील जिल्‍हा व तालुका स्‍तरावरील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील वेतन अद्याप मिळालेले नाही. तर काही कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी-मार्चचे वेतन प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा, निवेदने व आंदोलने करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने केला आहे.
    पाणी व स्वच्छता यासारख्या अत्यावश्यक सेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या वेतनासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. गेल्या 20-22 वर्षांपासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली असून उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी जोर धरत आहे.
    कृती समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, 25 एप्रिल 2026 पर्यंत वेतनाबाबत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच 20 एप्रिलपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करत असून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित निवेदन पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव तसेच राज्‍यातील सर्व जिल्‍हा परिषदांच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, आता शासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या