डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महापौर कविता संतोष मुळे यांच्याकडून पुतळा परिसराची पाहणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/04/2026 8:06 PM

नांदेड :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी आज शहराच्या मुख्य पुतळा परिसराला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. महामानवाच्या अभिवादनासाठी शहरात येणाऱ्या भीम अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये, या दृष्टीने त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी पुतळा परिसरातील विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणाची बारकाईने पाहणी केली. कडक उन्हाळा लक्षात घेता ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि फिरत्या शौचालयांची उपलब्धता ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे जयंतीच्या मिरवणूक मार्गावर स्वच्छता राखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याचे महापौरांनी स्पष्ट केले. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शिस्तीत आणि सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी महापौरांनी सांगितले की, "नांदेड शहरात महामानवाच्या जयंतीचा मोठा उत्साह आहे. महानगरपालिका प्रशासनातर्फे बाबासाहेबांच्या अनुयायांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुतळा परिसरात स्वच्छतेसह सर्व मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून, नागरिकांनी बाबासाहेबांची जयंती शांततेत आणि शिस्तीने साजरी करावी." 

या पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत नगरसेवक दयानंद वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी संघरत्न कांबळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, उद्यान विभागाचे गिरीश काठीकर, कनिष्ठ अभियंता ठानेदार यांच्यासह पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या