राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा राज्यात पाचवा;विभागात प्रथम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/03/2026 2:01 PM

नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६” अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मानांकनात नांदेड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या मानांकनात नांदेड जिल्ह्याने राज्यात पाचवा क्रमांक, तर लातूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या काही गुणांच्या फरकामुळे राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये स्थान मिळू शकले नसले तरी नांदेडची कामगिरी राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये गणली गेली आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे, तसेच सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून हे मानांकन देण्यात येते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित आढावा बैठका घेऊन प्रभावी नियोजन करण्यात आले.

उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य केले. या संयुक्त प्रयत्नांतूनच हे यश संपादन झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या