नांदेड :- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे जगभरातील माध्यम क्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल होत असून, या तांत्रिक क्रांतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम संशोधनात एआयची भूमिका’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठ परिसरातील माध्यमशास्त्र संकुलाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील माध्यमतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. धर्मेश धावणकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. धावणकर यांनी डिजिटल युगातील पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क क्षेत्रातील एआयच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सध्याच्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून जागतिक स्तरावर होणाऱ्या तांत्रिक बदलांची माहिती असणे अनिवार्य आहे. माध्यम संशोधनात अचूकता, वेग आणि माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा, याचे तंत्र त्यांनी सोप्या भाषेत उलगडून दाखवले. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी या नव्या दालनाची ओळख करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.सुहास पाठक यांनी भूषविले तर श्री शिवाजी महाविद्यालयाचे येथील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
माध्यम क्षेत्रातील वाढता तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि संशोधनातील आधुनिकता यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. संकुलातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ.पाठक यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद करतानाच विद्यार्थ्यांना अपडेट राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सचिन नरंगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विशेष व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी माध्यमशास्त्र संकुलाचे प्राध्यापक राजेंद्र गोणारकर, डॉ. कैलाश यादव आणि गिरीश जोंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना एका दिग्गज तज्ज्ञाशी थेट संवाद साधण्याची आणि तंत्रज्ञानाचे नवे पैलू समजून घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली.
या कार्यक्रमाप्रसंगी गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम, प्रा. राज गायकवाड, प्रा. अमोल घुले
यांच्या समवेत अनेक संशोधक विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते.