मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली, दि.२७,
मराठी भाषा अत्यंत समृद्ध, गोड आणि मायाळू आहे. काळाच्या ओघात स्वतःचे रूप बदलत आधुनिक जगाला साजेशी ठरलेली आपली मराठी भाषा टिकवणे आणि तिचा प्रसार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त आयोजित अभिजात मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, विठ्ठल मोहिते, सांगली जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष विकास जोशी यांच्यासह विविध वाचनालयांचे पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आधुनिक युगात फ्रेंच, इंग्रजी किंवा जर्मन यांसारख्या विविध भाषा अवगत असणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या मातृभाषेची शक्तिस्थळे आणि तिचे सौंदर्य आपण विसरता कामा नये. मराठी भाषक म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ एमपीएससी वर अवलंबून न राहता केंद्र सरकारच्या परीक्षांकडेही लक्ष दिले पाहिजे. बँकिंग, यूपीएससी, एनडीए, सीडीएस यांसारख्या विविध क्षेत्रात मराठी मुला-मुलींनी आपले यश सिद्ध करावे व मराठीचा गौरव वाढवावा, असे आवाहन करून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले, ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सांगली पॅटर्न अंतर्गत सांगलीतील सहा महाविद्यालयांमध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचे 'भावाभिव्यक्ती' वाचन कार्यक्रम संपन्न झाले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम घेत आहोत. दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सांगलीत 'ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी विठ्ठल मोहिते यांनीही मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार-प्रसार व संवर्धन व्हावे या हेतुने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतील विविध ग्रंथसंपदा, कुसुमाग्रजांचे साहित्य, कोशवाड्मय, विश्वकोश, शब्दकोश इत्यादी साहित्यांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.