नांदेड :- जैवशास्त्रातील नवोन्मेष व उपयोजन या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद (IALS–2026) चा समारोप दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधील जैवशास्त्र संकुल येथे उत्साहात पार पडला. ही परिषद नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे आणि पीएम - उषा (PM-USHA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
समारोप समारंभात मा. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक गिरी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन यांनी वाहकजन्य रोग आणि वाढती प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही जागतिक पातळीवरील गंभीर आव्हाने असल्याचे नमूद केले. या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बहुविद्याशाखीय व आंतरविद्याशाखीय संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समाजाभिमुख आणि लोककल्याणकारी संशोधनाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
परिषदेमध्ये देश-विदेशातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून जैवशास्त्रातील नवकल्पना, संशोधनाची दिशा आणि उपयोजन यावर सखोल चर्चा केली. विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान कार्यक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या परिषदेस प्रा. तिरफाप सी. कॅसेट डॉजीराम (बँकॉक, थायलंड), डॉ. हाडजी नियांग (सेनेगल, आफ्रिका), डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. एस. के. घोष, डॉ. टी. ए. कदम, डॉ. एस. पी. चव्हाण यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रुबिया शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एल. एच. कांबळे यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी जैवशास्त्र संकुलाचे संचालक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.