चंद्रपुर शहरात धारदार कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 01/07/2025 2:56 PM

◼️चंद्रपुर शहरात धारदार कोयत्यासह दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


चंद्रपुर, १ जुलै २०२५: चंद्रपुर शहरात धारदार कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंद्रपुर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. फुले चौक परिसरात हातात कोयता घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धमकावणाऱ्या या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून १६.१ इंच लांबीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथक पेट्रोलिंग करत असताना रात्री गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, बाबूपेठ वार्डातील महादेव मंदिराजवळ राहणारा सागर उर्फ गणपत शंकर भुजोने (वय ४१) हा फुले चौकात धारदार कोयता घेऊन दहशत माजवत आहे. या खबरेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळ गाठले. तेथे सागर हा हातात कोयता घेऊन नागरिकांना धमकावताना आढळला. पोलिसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून १६.१ इंच लांबीचा लोखंडी कोयता, ज्याची पात्याची लांबी १२.७ इंच आणि कापडी मुठीची लांबी ३.४ इंच आहे, असा हत्यार जप्त करण्यात आला. या कोयत्याची किंमत अंदाजे १०० रुपये आहे.

पोलिसांनी आरोपी सागर भुजोने याच्याविरुद्ध चंद्रपुर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४७/२०२५ अंतर्गत कलम ४.२५ भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. सागर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे आणि डी.बी. पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

पोलीसांचा नागरिकांना आवाहन:  
चंद्रपुर शहर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा गैरकृत्य आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Share

Other News

ताज्या बातम्या