* *लोकसभा झाली आता विधानसभा ही झाली जनता जनार्दनाने आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांना सलग तिसऱ्यांदा तर आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांना सलग पाचव्यांदा बहुमतांनी निवडून दिले. परंतु आता त्यांनी दिलेल्या आश्वासनांना जागण्याची वेळ आली असून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांना वाचा फोडत त्यावर ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.* *महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्या आ पासून उभ्या असून शेरी नाला,नदीचे होणारे प्रदूषण, मोकाट जनावरे यांसह मोकाट कुत्री, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नुकत्याच कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना ठिकठिकाणी पडणारी भगदाडे, दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा, विस्तारित भागातील रस्ते, लाईट, पाण्याची दुरावस्था यासह इतर अनेक समस्यांबाबत सांगली मिरजेचे विद्यमान आमदार महानगरपालिका प्रशासनाबरोबर कधी आढावा बैठक घेऊन याबाबत प्रशासनास जाब विचारणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागलाय..* *ज्या मतदारांनी तुम्हाला बहुसंख्य मतांनी निवडून दिले त्या मतदारांच्या समस्यांचा जाब महापालिका प्रशासनास* *विचारण्यासाठी लवकरात लवकर आपण आढावा बैठक घ्यावी. कारण याबाबत निवडणूक निकालानंतर एकही पाऊल पुढे टाकलेले दिसत नाही.*
*ज्या मतदारांच्या मतावर आपण बहुमताने निवडून आला त्या मतदारांच्या मूलभूत प्रश्नाकडेही आपण दुर्लक्ष करता कामा नये. विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रिस नायकवडी याबाबत बैठक घेऊ शकतात तर आपणास काय अडचण आहे? लवकरात लवकर महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेऊन या मूलभूत प्रश्नांकडे त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. आपण त्या दृष्टीने लवकरच पावले उचलाल हीच लोकहित मंचची अपेक्षा!!*
*मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच सांगली*