आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी*
सातारा, दि. : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ मतदानाच्या दिवशी (दि.२०.११.२०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि.१९.११.२०२४) प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित करणे अनिवार्य आहे. जोपर्यंत मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस या दोन दिवसांमध्ये प्रिंट मीडियामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण कक्षाकडून प्रमाणित करून घेतल्या जात नाहीत तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या २ (दोन) दिवस आधी MCMC समितीकडे अर्ज करावा. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेणेबाबत निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या आहेत.