निवडणुकीच्या परिणामाची चिंता नाही; जनतेला दिलेला शब्द महत्त्वाचा
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मनाचा मोठेपणा; घाटंजी, केळापूरला कोट्यवधींचा निधी
२९ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या सांस्कृतिक भवनाने दोन्ही तालुक्याची वाढणार शान
चंद्रपूर, दि. १७ : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-वणी-आर्णीच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा एकत्रित निधी खेचून आणण्याचे मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी त्याचा उल्लेखही केला होता. त्यानंतर निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. अशात दुसरा कुठलाही नेता असता तर त्या क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असते. पण राजकीय नेता शब्दाचा किती पक्का असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुनगंटीवार आहेत. सुधीरभाऊ विकासासाठी कोणत्याही पदाचा विचार करत नाहीत. उत्तम दर्जाचे सामाजिक सभागृह करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान ना. मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता. घाटंजी आणि केळापूर येथील सांस्कृतिक भवनासाठी प्रत्येकी १४ कोटी ९३ लक्ष रुपयांचा निधी देऊन त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.*
सुधीर मुनगंटीवार यांनी किंतु-परंतु न बाळगता मनाचा मोठेपणा दाखविला. आणि यवतमाळ जिल्ह्यातील तालुका घाटंजीला सांस्कृतिक भवनासाठी १४ कोटी ९३ लक्ष १० हजार रुपये आणि केळापूरला सांस्कृतिक भवनासाठी १४ कोटी ९३ लक्ष १० हजार रुपये असा निधी दिला आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना वंदे भारत एक्स्प्रेसची अनोखी भेट देणाऱ्या ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यालाही मन मोठे करीत निधी प्रदान केला आहे. कोट्यवधींच्या या निधीतून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आणि केळापूर येथे सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. या सभागृहांमुळे घाटंजी आणि केळापूरची शान वाढेल, असे भवन उभारण्यात यावे, असे निर्देशही मुनगंटीवार यांनी सर्व संबंधिताना दिले आहेत.
...तर चित्र वेगळे असते
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्याची साथ मुनगंटीवार यांना मिळू शकली नाही. परंतु, याची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दोन सांस्कृतिक भवनांसाठी तब्बल २९ कोटी ८६ लक्ष २० हजार रुपयांचा निधी दिला आहे. मुनगंटीवार जर चंद्रपूर-वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार झाले असते, तर विकासकामांचा ओघ अव्याहतपणे सुरू राहिला असता. राज्य सरकार आणि केंद्राच्या तिजोरीतून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला असता. चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचाही कायापालट झाला असता, अशी प्रतिक्रिया आता यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उमटत आहे.