आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून सध्या देण्यात येणारी १ लाख रुपयांची आर्थिक मदत वाढवून ५ लाख रुपये करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी मा. स्नेहल कनिचे मॅडम यांना समाजवादी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाढते कर्ज, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, नैसर्गिक आपत्ती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. अशा परिस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळते. त्यामुळे शासनाने केवळ औपचारिक मदत न करता या कुटुंबांना ५ लाख रुपयांची सन्मानजनक आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव व समाजवादी पार्टी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजीराव परूळेकर, समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. नितीन मिरजकर, समाजवादी नेते श्री. हसन देसाई, समाजवादी पार्टीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री. मधुकर पाटील तसेच माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील यांचे चिरंजीव श्री. वसंतराव पाटील उपस्थित होते.