महापालिकेत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कार्यरत शहर व वस्ती स्तर संघांच्या अध्यक्ष व सचिवांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/08/2026 6:55 PM

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बाल कल्याण समितीच्या *सभापती सौ.सदिच्छा सोनी पाटील* यांच्या सूचनेवरून सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महापालिका मुख्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहरामध्ये 'दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (DAY-NULM) अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व महिला शहर स्तर संघ आणि वस्ती स्तर संघांचे अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने लवकरच शहरात एक भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत मेळाव्याचे स्वरूप आणि कार्यक्रमाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि सेवांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'महिला मॉल' सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बचत गटांमधील महिलांच्या कौशल्यांना आणि ज्ञानाला वाव देण्यासाठी विशेष 'महिला बचत गट अभ्यास दौरा' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शहरात कामानिमित्त राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी 'काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह' सुरू करण्याबाबत विचारविनिमय झाला.

या बैठकीदरम्यान महिला बचत गटांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी समजून घेण्यात आल्या, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या नाविन्यपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत कदम, प्रविण मगरे, श्रीमती सोनी सोनकांबळे,श्रीमती रेणुका केंद्रे अध्यक्ष रमाई CLF,श्रीमती अनुराधा मठपती अभ्यक्ष निर्भया CLF, रजिया बेगम,रंजना कांबळे,गोदावरी गोडबोले,सुनंदा एडके,ज्योती साबळे व्यवस्थापिका CLC, इत्यादी महिला प्रतिनिधी आणि नांदेड शहरातील विविध वस्त्यांमधून आलेल्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व स्तरांतील महिलांचा सक्रिय सहभाग लाभल्यामुळे ही बैठक अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

Share

Other News

ताज्या बातम्या