कुपवाडमध्ये १०० फुटी राष्ट्रीय तिरंगा ध्वज व कै मा. आ. शरद पाटील स्मृती उद्यानाचे दिमाखात भुमिपूजन संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/08/2026 5:21 PM

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सोहळा; दीड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

कुपवाड: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड शहरात मुख्य रस्त्यावरील (सि.सं.नं. ७७४) विकासकामांना गती देत, नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या १०० फुटी भारतीय तिरंगा ध्वज उभारणी व 'कै. मा.आ. शरद पाटील स्मृती उद्यान' विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते आणि सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

मनपा क्षेत्रातील उद्याने विकसित करणे व उपमहापौर निधी अंतर्गत १ कोटी ५० लाख रुपये अंदाजित खर्चाच्या या कामास मंजुरी देण्यात आली असून, ३०० दिवसांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या कामाच्या व्यापात प्रामुख्याने कंपाऊंड वॉल, फुटपाथ, सुंदर गार्डन, वीट बांधकाम, फॅब्रिकेशन वर्क, दगडी बांधकाम, १०० फूट उंच राष्ट्रध्वज, सिमेंट बेंच, कै. माजी आमदार शरद पाटील यांचा जीवनपट दर्शवणारे आकर्षक म्युरल्स, विद्युत रोषणाई कमान आणि पंचधातूमधील आकर्षक अशोक स्तंभ यांचा समावेश असणार आहे.

या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. विशाल पाटील, आणि दिवंगत मा. आमदार शरद पाटील यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रतन शरद पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.

तसेच, उपमहापौर मा. श्री. गजानन मगदूम, सभागृह नेता मा. श्री. संदीप आवटी, परिवहन समिती सभापती मा. श्री. प्रकाश पाटील, प्रभाग समिती-३ च्या सभापती मा. माया गडदे यांच्यासह महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी,नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात निवेदकांच्या प्रास्ताविक शाब्दिक स्वागताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्य रस्त्यावरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण मान्यवरांच्या हस्ते पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

उपमहापौर मा. श्री. गजानन मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रकल्पाची रूपरेषा मांडली. त्यानंतर, उपमहापौरांच्या हस्ते पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान खासदार मा. श्री. विशाल पाटील, महाराष्ट्र जनता दलाचे अध्यक्ष मा. नाथाभाऊ शेवाळे आणि महापौर मा. श्री. धीरज सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कुपवाड शहराच्या सौंदर्यीकरण आणि विकासासाठी अशा प्रकारच्या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सभागृह नेता मा. श्री. संदीप आवटी यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या