आपले सरकार सेवा केंद्रांना स्मार्ट लुक देण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/08/2026 5:39 PM

नांदेड :- जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांनी शासन निर्णयानुसार निर्धारित गुणवत्ता, मानांकन व सन्मान कार्यपद्धतीचे मुदतीत पालन करणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने  जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले यांनी आज दिनांक 22 ऑगस्‍ट २०२६ रोजी प्रत्यक्ष दोन आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन केंद्रांची सखोल पाहणी केली. पाहणीदरम्यान शासनाच्या निकषांचे पालन न करणार्या केंद्रावर कार्यवाही करण्यात आली, त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रचालकांमध्ये स्पष्ट संदेश गेला आहे.
  या पाहणीमध्ये शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या जागेत सुरू आहे काय, केंद्राचे आतील व बाहेरील बॅनर, उपलब्ध सेवा व दरसूची, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, संगणक संच, प्रिंटर, UPS, वेब कॅमेरा, नागरीकांना सभ्‍यतेची वागणुक, केंद्राच्या खोलीची आवश्यक आकारमानाची पूर्तता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अर्जदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसेच संगणक प्रणालीमध्ये अर्जदारांची कागदपत्रे व छायाचित्रांची माहिती सुरक्षित पद्धतीने जतन करणे बाबत पडताळणी करण्यात आली.
  तसेच  जिल्हाधिकारी यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर उपस्थित अर्जदारांशी सेवा बाबत प्रत्यक्ष संवाद साधून शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा पावतीशिवाय अथवा अतिरिक्त रक्कम आकारली जाते काय, याची चौकशी केली. अर्जदारांना प्रमाणपत्रानुसार तात्‍काळ पावती दिली जाते काय, तसेच ऑनलाईन पावतीमध्ये नमूद असलेल्या शुल्कानुसारच रक्कम स्वीकारली जाते काय, याचीही प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. अर्जदारांनी सर्व सेवाकरीता केंद्रचालकाकडुन रितसर पावती घ्‍यावी. 
आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक, सुलभ व नियमानुसार उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सर्व केंद्रचालकांनी शासन निर्णयातील सर्व निकषांची काटेकोरपणे पूर्तता करून केंद्रे नियमितपणे सुरू ठेवावीत. नियमांचे उल्लंघन, अनधिकृत शुल्क आकारणी, अपुऱ्या सुविधा किंवा केंद्र बंद ठेवणे आढळल्यास संबंधित केंद्रावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश  जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या पाहणीमधून दिला आहे.
  या अनुषंगाने निवासी उप जिल्‍हाधिकारी किरण आंबेकर यांनी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार काम करावे,अन्यथा कठोर कारवाई स सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. 
  या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या