भगूर येथे विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा जागर
भगूर, दि. ९ ऑगस्ट २०२६ :
भगूर येथे रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी आदिवासी समाज उत्सव समिती, भगूर व बिरसा ब्रिगेड मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा, रीती-रिवाज, लोककला तसेच निसर्गाशी असलेले अतूट नाते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात संतोष पिंपळे सर यांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, पारंपरिक जीवनपद्धती, रूढी-परंपरा आणि सामाजिक योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. दीपा पिंपळे यांनी ‘विश्व आदिवासी दिवस का साजरा केला जातो?’ यामागील उद्देश स्पष्ट करत आदिवासी समाजाच्या हक्क, अस्मिता आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी माननीय सुरेखा हांडगे, भगूर नगरपरिषद नगरसेविका मनीषा कस्तुरे, लता थापेकर तसेच नगरसेवक बबलू जाधव ,भनपा या,उपनगराध्यक्ष किशोर कुंडारिया अशोक कुंडारिया यांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष पिंपळे सर यांनी मांडली.
हा कार्यक्रम माजी नगरसेविका भगूर तथा बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिक संगीता ताई मंगेश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास आदिवासी समाज उत्सव समितीचे अध्यक्ष संजय घोरपडे, विश्वनाथ वाघ, अरुण मुकणे, सचिन मुकणे, सुनील घोरपडे, संजय भांगरे, सुधीर मुकणे, विठ्ठल कुल्लाळ, देविदास आंबेकर, प्रभाकर कुल्हाळ, संजय वाघ,गौतम हांडगे मनपा अभियंता मंगेश पिंपळे, सुमनताई घोरपडे माजी नगरसेविका, माजी सरपंच सारिका निंबेकर, राणी दुर्गावती महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता घोरपडे, अनिता वाघ (मातृशक्ती नाशिक), मंदा मुकणे, अलका कुऱ्हाळ, भारतीय मुकणे, बकुताई गोडे, कल्पना पवार, शिल्पा जाधव वैशाली लोहरे तसेच रेणुका माता महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी भगूर परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव, महिला, युवक व नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थितांनी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
🌿 अस्मिता, संस्कृती आणि एकतेचा संदेश
विश्व आदिवासी दिवस हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, इतिहास, संघर्ष, परंपरा आणि एकतेचा गौरव करण्याचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, लोककला, लोकजीवन आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमीन या जीवनाशी निगडित असलेल्या मूलभूत हक्कांचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले.