नांदेड :- मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रतिबंध व उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस ठाणे अर्धापूर येथील पोलीस पथकाने अथक परिश्रम, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे तीन गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल करून सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला पोषण आहार, मोटारसायकली व मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहार चोरीचा गुन्हा उघडकीस -
दिनांक 04 ते 05 ऑगस्ट 2026 रोजी अज्ञात आरोपींनी मौजे खरब, अर्धापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कडी-कोंडा व कुलूप तोडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी ठेवलेले धान्य व इतर साहित्य चोरून नेले. चोरीस गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत ₹30,850/- इतकी होती. वगैरे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे अर्धापूर येथे गु.र. क्र. 0432/2026, कलम 331(4), 305 (A) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण व संशयितांची पडताळणी करून जमील खान अंबीया खान (वय 19 वर्षे, रा. महमदियानगर, अर्धापूर) व शेख शाहेद शेख चाँद (वय 19 वर्षे, रा. खुबा कॉलनी, अर्धापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण पोषण आहार व साहित्य किंमत ₹30,850/- असा 100% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
2) मोटारसायकल चोरी प्रकरणाची यशस्वी उकल -
मौजे खुबा कॉलनी, अर्धापूर येथील फिर्यादी असिफ लालची खान यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल तसेच शेजारी राहणारे सय्यद सय्यद अली यांच्या मालकीची एक मोटारसायकल अज्ञात आरोपींनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे अर्धापूर येथे गुर, क्र. 0433/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, संशयितांची माहिती संकलित करून शेख शाहेद शेख चाँद (वय 19 वर्षे, रा. खुबा कॉलीन, अर्धापुर) व शेख सुलेमान शेख जिलानी उर्फ पप्पू (वय 22 वर्षे, बोंढार हवेल, कांदा मार्केट, नांदेड) यांना अटक केली. आरोपींकडून चोरीतील दोन मोटारसायकली RJ-26CF-0206 व MH-12-TM-7893 (एकूण किमत अंदाजे ₹1,50,000/-) जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास सुरू आहे.
3) जबरी चोरी (Robbery) प्रकरणातील आरोपी जेरबंद -
दिनांक 27 मे 2026 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रंगनाथ मुंजाजी गाढवे, रा. दत्तनगर, नांदेड हे त्यांच्या मित्रासह हिंगोलीकडे जात असताना नांदेड-हिंगोली रोडवरील राजहंस मंगल कार्यालयासमोर अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील Nothing कंपनीचा मोबाईल, Realme कंपनीचा मोबाईल तसेच रोख ₹13,000/- असा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे अर्धापूर येथे गु.र. क्र. 0294/2026, कलम 309 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण व संशयितांची पडताळणी करून पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन 1) मोहम्मद सुफियान मोहम्मद शकील (वय 21 वर्षे, मंडई, इतवारा), 2) मोहम्मद इस्माईल खान मोहम्मद अहेमद खान (वय 23 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, नांदेड) व 3) शेख इलियास (रा. नांदड) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींकडून ₹11,000/- किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्देमालाच्या जप्तीसाठी पुढील तपास सुरू आहे.
सदर तीनही गुन्ह्यांचा समांतर तपास करून आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मांजरमकर, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात भास्कर कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक, सुरेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गोणारकर, घोरपडे, मुंगल, डांगे, बेग, विजय कदम, शहा, भिसे, पुलकूटवार, हेमंत बिचकेवार महिला अंमलदार इंदु गवळी, बोकारे सर्व नेमणुक पोलीस ठाणे अर्धापुर तसेच सायबर पोलीस येथील राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली.