अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : रवीकुमार शिंदे
नान्नज, दि. ९ ऑगस्ट २०२६ : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी प्रलंबित जनहिताच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नान्नज ग्रामस्थांच्या वतीने आज, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेभोसले यांनी कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला नान्नजमधील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला असून, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उपोषणकर्ते शहाजी राजेभोसले यांनी मांडलेल्या मागण्या या जनहिताच्या असून त्या प्रशासनाने गांभीर्याने विचारात घ्याव्यात. तसेच उपोषणामुळे राजेभोसले यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रशासनाला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आजच्या गाव बंदनंतरही प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास जामखेड–करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, नान्नज गावातील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची वेळेत दखल घेऊन योग्य तोडगा काढावा; अन्यथा आमरण उपोषण आणि आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
#नान्नज
#शहाजीराजेभोसले
#जामखेड
#नान्नजगावबंद
#ग्रामस्थआंदोलन