नांदेड : शहरातील नंदीग्राम सोसायटीमधील कृष्णा चौक येथे ४०० मिमी व्यासाच्या मुख्य भुयारी जुनी ड्रेनेज लाईनवरुन अवजड रेतीचा ट्रक गेल्यामुळे काळ्या मातीचा भाग आतुन कोसळुन रस्त्याचा भाग खचून एक रेतीचा ट्रक फसला होता. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलत सदर ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढला असून, प्रभावित भागातील पाईपलाईन व रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
नंदीग्राम सोसायटीच्या कृष्णा चौकातून महानगरपालिकेची मुख्य भूमिगत ड्रेनेज लाईन गेलेली आहे. या मुख्य लाईनला आडव्या गल्लीतून येणारी ४०० मिमी व्यासाची ड्रेनेज लाईन एका 'टी-जॉईंट' द्वारे जोडण्यात आली आहे. सदरील जमीन काळ्या मातीची असल्याने त्यावरुन हा वाळुचा अवजड ट्रक गेला असल्याने तो भाग खचला आहे. त्यामुळे रस्त्याखालील ४०० मिमी व्यासाची जुनी ड्रेनेज ड्रेनेज लाईन आतून कोसळली. लाईन कोसळल्यामुळे त्या भागातील अंतर्गत माती आणि रस्त्याखालचे रोड मटेरियल पाण्यासोबत व सांडपाण्यासोबत वाहून गेले. परिणामी, रस्त्याखाली मोठी पोकळी निर्माण झाली आणि वरून जाणाऱ्या जड रेतीच्या ट्रकचे वजन न पेलल्याने ट्रक तेथे खचून फसला.
या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम क्रेनच्या सहाय्याने फसलेला जड रेतीचा ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या या चौकातील वाहतूक वळवण्यात आली असून परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
सध्या मुख्य आणि ४०० मिमी व्यासाच्या दोन्ही वाहिन्यांची जोडणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. रस्त्याखालील पोकळी भरून काढून रस्ता पूर्ववत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेचे तांत्रिक पथक घटनास्थळी अहोरात्र काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.