कृष्णा व्हॅली चेंबरतर्फे ७ ऑगष्टला एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/08/2026 1:39 PM

कुपवाड : प्रतिनिधी 

उद्योजक व व्यावसायिकांना उद्योगाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या अर्थसहाय्याची माहिती तसेच विविध एमएसएमई कर्ज योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम २०२६” आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स, प्लॉट क्र. ३३, ३४, ३५, एमआयडीसी, कुपवाड, सांगली येथे होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये उद्योजकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध एमएसएमई कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असून, उद्योगाच्या गरजेनुसार योग्य आर्थिक पर्याय, कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्थसहाय्याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमामध्ये आकर्षक व स्पर्धात्मक व्याजदर, कमी प्रक्रिया शुल्क, जलद कर्ज मंजुरी प्रक्रिया, सुलभ दस्तऐवजीकरण तसेच व्यवसायाच्या गरजेनुसार आर्थिक उपाययोजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेंट बिझनेस, सेंट कॉन्ट्रॅक्टर, सेंट इंजिनिअरिंग, सेंट हॉटेल, सेंट एनर्जी एफिशियन्सी, सेंट व्हेईकल बिझनेस, सेंट जीएसटी यांसह विविध एमएसएमई कर्ज योजनांची माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे.

उद्योगांच्या वाढीसाठी व विस्तारासाठी उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्याच्या संधींचा लाभ घेण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील उद्योजक व व्यावसायिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या