नांदेड :- राज्यातील शेतकऱ्यांना जगभरातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी समजून घेता यावी आणि शेतमाल निर्यातीला चालना मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने देशाबाहेरील अभ्यास दौरा योजना 2026-27 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 5 पात्र शेतकऱ्यांना परदेशात जाऊन प्रगत शेतीचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. परदेश अभ्यास दौरा योजना 2026-27 साठी युरोप व चीन या देशाची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना गुरूवार 20 ऑगस्ट 2026 पर्यंत सायं 5 वा. पर्यंत आपले अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे.
*अशी असेल वर्गवारी*
महिला शेतकरी 1 जागा. कृषी पुरस्कार प्राप्त / पीक स्पर्धा - 1 जागा. इतर सर्वसाधारण शेतकरी- 3 जागा याप्रमाणे एकूण 5 शेतकरी असतील.
*पात्रतेचे निकष*
शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. अर्ज सादर करतेवेळी पारपत्राची वैध मुदत किमान एक वर्ष असावी. अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी.
शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील.
शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. २.०० लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज गुरूवार 20 ऑगस्ट पर्यंत सायं 5 वा. पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात करावा. यासाठी इच्छुकांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीद्वारे पात्र प्रस्तावातून निवड यादी तयार करण्यात येईल तसेच ज्येष्ठता क्रमवारीनुसार प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. जिल्हास्तरीय समिती समोर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात येथे सोडत होईल सोडत 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता होईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.