नांदेड : राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ११ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत "जागतिक लोकसंख्या दिन" सप्ताह अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे "दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर" हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ अनपेक्षित गर्भधारणा टाळणे इतकाच मर्यादित नसून, माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब नियोजनाचे महत्त्व जनमानसात रुजविणे हा आहे. कुटुंब नियोजनाच्या सेवांच्या अनुपलब्धतेमुळे वाढणारी अनावश्यक गर्भधारणा, माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लोकसंख्या सप्ताहामध्ये आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये खालील प्रमुख सेवा व योग्य समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आधुनिक तात्पुरत्या पद्धती: यामध्ये अंतरा इंजेक्शन, छाया गोळ्या, तांबी (IUD) व इतर साधनांचा समावेश आहे.
कायमस्वरूपी पद्धती: पुरुष व महिलांसाठी सुरक्षित नसबंदी शस्त्रक्रिया.
तातडीचे समुपदेशन व आपत्कालीन सेवा
तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या व माता-बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे .