नांदेडः वीरशैव लिंगायतमध्ये अनेक पोटजाती आहेत. परंतु, या समाजाची वीरशैव लिंगायत म्हणून एक वेगळी ओळख आहे. या समाजाच्या धार्मिक परंपरा आणि रुढी यांचे धर्मग्रंथांमध्ये अनेक पुरावे आढळतात. देशामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सहा धर्मांशिवाय सातवा धर्म म्हणून वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती केदारपिठाचे जगद्गुरू रावल विद्याविभूषित श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग महास्वामीजी यांनी दिली.
या संदर्भात आनंदनगर परिसरातील श्री केदारेश्वर सत्संग भवनात आयोजित केलेल्या एका व्यापक बैठकीत धर्मोपदेश करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र व तेलंगणातील २५ पेक्षा अधिक मठाधिपतींसह भाजपाचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती. श्री केदार जगद्गुरू पुढे म्हणाले की, देशामध्ये जातीनिहाय जणगनणा होऊ घातली आहे. ही जणगनणा पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. सध्या अस्तित्वामध्ये हिंदू, बौद्ध, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन, शीख या धर्मांना संविधानिक मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये धर्माचा सातवा रकाना सध्या रिक्त आहे. सातवा धर्म म्हणून वीरशैव धर्मास मान्यता देणे गरजेचे आहे. यासाठीचे सर्व पौराणिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक पुरावे अनादीकाळापासून अस्तित्वात असलेल्या धर्मग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत.
या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी हा निर्णय घाईघाईत घेण्यापेक्षा या संदर्भात समाजातील कायदेतज्ज्ञ, धर्मगुरू व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची एक व्यापक बैठक २ ऑगस्ट रोजी उदगीर येथे घेण्यात येईल. या बैठकीत व्यापक समावेश असलेल्या मान्यवरांचे एक शिष्टमंडळ तयार करण्यात येईल व हे शिष्टमंडळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटून वीरशैव लिंगायत धर्मास मान्यता देण्यासाठी विनंती करेल, अशी माहिती यावेळी श्री केदार जगद्गुरू यांनी उपस्थितांना दिली. यावेळी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.