गॅसचा काळाबाजार होत असताना पुरवठा विभाग सुस्तच,

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/04/2026 10:25 PM

♦️ निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मिरज सुधार समितीची मागणी  

व्यवसायिक गॅस पुरवठा बंद असल्याने घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असतानाही मिरज तहसील पुरवठा विभाग सुस्तच आहे. निष्क्रिय पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने तहसीलदार सौ. अर्पणा धुमाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अमेरिका-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र व राज्य सरकारने व्यवसायिक गॅसचा पुरवठा पुर्णपणे थांबविला आहे. तसेच, घरगुती गॅस वितरणावर अनेक प्रकारच्या अटी लागू केलेल्या आहेत. या निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून मिरज शहरातील गॅस वितरक व कर्मचारी घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहेत. अनेक गॅस एजन्सीकडे बोगस नावाने गॅस कनेक्शन आहेत. याचा गैरफायदा घेत गॅस वितरक कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन घरगुती गॅस व्यवसायिक कारणांसाठी तिप्पट दराने विकत असल्याने शहरात घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन सर्वसामान्यांची लुट होत आहे.
या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीस आला आहे. शहर व ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार होत असताना मिरज तहसील विभागातील पुरवठा विभागातील अधिकारी सुस्त असून कोठेही कारवाई होताना दिसत नाही. म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, अभिजीत दाणेकर, सुरेश झेंडे, अमीर डांगे आदी सदस्यांनी पुरवठा निरीक्षक वर्षा कदम आणि हणमंत पाटील यांना जाब विचारला. पुरवठा अधिकाऱ्यांचा थातुरमातुर उत्तराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरकांचा शोध घेऊन तसेच, कामात कसुर करणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने तहसीलदार सौ. अर्पणा धुमाळ यांच्याकडे केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या