अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान 'टायसन'अव्वल,सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/04/2026 7:52 PM

नांदेड :- नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान 'टायसन' याने चमकदार कामगिरी करत 'आज्ञाधारकता' (Obedience) या प्रकारात सुवर्णपदक, तर 'अज्ञात व्यक्तीने दिलेले अन्न नाकारणे' (Refusal of food) या प्रकारात रौप्यपदक प्राप्त करून आपला ठसा उमटवला आहे. श्वान 'टायसन' हा परभणी पोलीस दलात आपली सेवा बजावत आहे.

दरवर्षी, प्रथमतः परिक्षेत्र व राज्य पातळीवर, पोलीस कर्तव्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. न्याय सहाय्यक विज्ञानाचा तपास कामात वापर, पोलीस फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, संगणक कौशल्य, घातपात विरोधी तपासणी, श्वान कौशल्य इत्यादी विषयांत निष्णात असणारे अधिकारी, अंमलदार व श्वान पथके सदर स्पर्धेत सहभागी होत असतात. राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील कामगिरीतून त्यांची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निवड होत असते.

यावर्षी, पुणे येथे झालेल्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात, परभणी जिल्ह्यातील 'टायसन' हा श्वान नांदेड परिक्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असताना, सदर स्पर्धेत त्याने दोन पदके प्राप्त केल्याने, त्याची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड करण्यात आली होती.

नुकताच, दिनांक 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 04, नागपूर येथे, 69 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (All India Police Duty Meet / AIPDM), 2025-2026 संपन्न झाला. दरवर्षी, भारतातील सर्व राज्यांचे पोलीस व निमलष्करी दलांचे संघ यात सहभागी होत असतात. सदर स्पर्धेत, यावर्षी 28 घटक राज्य, 08 केंद्रशासित प्रदेश यांचेसह, सीमा सुरक्षा बल (BSF), सशस्त्र सीमा बल (SSB), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), राष्ट्रीय सुरक्षा बल (NSG), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), विशेष सुरक्षा बल (SPG) व आसाम रायफल यांचे एकूण (148) श्वान सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाकडून गुन्हे शोधक श्वानाचे नेतृत्व करण्याचा मान नांदेड परिक्षेत्रातील परभणी पोलीसांचा श्वान 'टायसन' व त्याचे हँडलर पोलीस हवालदार रामचंद्र जाधव व पोलीस शिपाई सादेक पठाण यांना मिळाला होता.

श्वान टायसन व त्याच्या हँडलरनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेतील SEEK AND FIND प्रकारात सुवर्णपदक व OBEDIENCE (आज्ञाधारकता) व REFUSAL OF FOOD (दुसऱ्याने देवू केलेले अन्न श्वानाने नाकारणे) या प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे.

सन 2022 मध्ये परभणी पोलीस दलात दाखल झालेल्या श्वान टायसनने यापूर्वी देखील खालील प्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

2022 : CID पुणे येथे विशेष प्रशिक्षण पूर्ण

चोरी, दरोडा, खून व मिसिंग गुन्ह्यांच्या तपासात मोलाची मदत

2023 : राज्य पोलीस वर्धापन दिन, मुंबई उत्कृष्ट डॉग शो सादरीकरण

2023 : नांदेड परिक्षेत्र कर्तव्य मेळावा सुवर्णपदक

2025: 68 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (रांची) मध्ये सहभाग.

2025 : महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा- रौप्य पदक

परभणी चे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली, कंधार विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आयुब खान पठाण यांचे सह, हँडलर पोहेकों/ रामचंद्र जाधव व पोशि/ सादेक पठाण यांनी श्वानाच्या प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सदर श्वान पथकाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने नांदेड परिक्षेत्राची मान उंचावली असल्याने, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी श्वान पथकातील अधिकारी व अंमलदारांना 25,000 रुपयांचे बक्षीस व प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या