नांदेड :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व लघुनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह, नांदेड, अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, हदगाव तसेच अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, नायगाव येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे हे होते, तर सहाय्यक ग्रंथपाल नरेंद्र मस्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील समता दूत कार्यक्रमातील प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये निवासी शाळा व वस्तीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडत सामाजिक समतेचा संदेश दिला.
हा कार्यक्रम सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले.