मायबोलीत बोलू या! चला... मराठीतच बोलू या !!मराठी भाषा गौरव दिन :

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 27/02/2026 8:48 AM



मायबोलीत बोलू या! चला... मराठीतच बोलू या !!मराठी भाषा गौरव दिन : 

आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

दि:27 फेब्रुवारी वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

21 जानेवारी 2013 रोजी मराठी भाषा विभागान े अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. तसेच 3 ऑक्टोबर रोजी राज्यात 'अभिजात मराठी भाषा दिन' साजरा केला जातो. तर दरवर्षी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्यभरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, वाचन उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन्ही दिवसांत राज्यभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी आणि विस्तारासाठी चिंतन करण्याची ही संधी असते. चला, यावर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला समृद्ध करणाऱ्या उपभाषांचा वाटा समजून घेऊया.

विविध उपभाषांचा समृद्ध वारसा महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथ, महानुभाव आणि वारकरी संत परंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिकव्यापक केले. 

आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे... तुम्हाला माहिती आहे, श्री. चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदास, शूद्रक यांच्या शाकुंतल, मृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोली भाषेत आहेत.

वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, झाडीबोली, खानदेशी, गोंडी, बंजारा, कोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.

जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होते, तशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवा, विस्तार आणि ऊर्जा दिली आहे.

उदाहरणार्थ, वऱ्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 'ग्रामगीता' मध्ये वऱ्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे. तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वऱ्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो. आचार्य प्र.के. अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वऱ्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.

कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जातात, तर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.
उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. 'अक्का' हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वऱ्हाडीमध्ये, झाडीबोलीत हिंदीचे, तर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आह े - स्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची !

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास

उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाषाविषयक स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्राचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. मराठीचा प्रशासनिक, शैक्षणिक आणि सामाजिक वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.

शासन प्रयत्नशील आहेच; परंतु सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विविध बोलीभाषांचा अभ्यास करून त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. भाषेचे  संवर्धन हे केवळ धोरणातून नाही, तर व्यवहारातून होते.


Share

Other News

ताज्या बातम्या