जिल्हा कारागृहातील संस्कार शाळेमुळे बंदीवानांचे मनोबल उंचावले प्रतिनिधी राविराज शिंदे

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 03/02/2026 8:08 AM



अहिल्यानगर, दि. २ :-  महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा कारागृहात (वर्ग-२) बंदीवानांच्या मानसिक प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जन शिक्षण संस्थानच्या सहकार्याने आयोजित 'कैद्यांची संस्कार शाळा' या उपक्रमात महसूल सहायक अशोक मासाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनातून बंदीवानांना नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या या योगदानाबद्दल कारागृह प्रशासनाकडून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. "माणूस चुकू शकतो, परंतु सुधारण्याची संधी प्रत्येकाला असते," अशा शब्दांत अशोक मासाळ यांनी बंदीवानांशी संवाद साधला. शिक्षा भोगणे हा केवळ दंड नसून ती स्वतःला बदलण्याची एक संधी आहे. मनात जिद्द असेल तर कारागृहातून बाहेर पडल्यानंतरही एक यशस्वी व सन्माननीय नागरिक म्हणून जगता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

बंदीवानांच्या शंकांचे निरसन करत त्यांनी अत्यंत तन्मयतेने व आपुलकीने मार्गदर्शन केले. केवळ कारागृहातील सुधारणा नव्हे, तर समाजात बालगुन्हेगारी रोखणे व तरुण वयात चुकीच्या मार्गाला लागलेल्या युवकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे हे आपले ध्येय आहे. यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून 'युवा सशक्तीकरण व युवाजागृती' अभियान राबविण्याचा मानसही मासाळ यांनी यावेळी बोलून दाखवला.

श्री. मासाळ यांच्या मार्गदर्शनामुळे बंदीवानांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडल्याचे व त्यांचे मनोबल उंचावल्याचे दिसून आले. या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन जिल्हा कारागृह अधीक्षक संतोष कवार यांनी मासाळ यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार, सय्यद साहेब, महसूल विभागाचे नायब तहसीलदार मोहसीन शेख, नायब तहसीलदार योगेश कुलकर्णी, विजय कवडे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. सचिन बडे यांच्यासह जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

#संस्कारशाळा #जिल्हाकारागृह #अहिल्यानगर #बंदीवानसुधारणा #अशोकमासाळ #सकारात्मकबदल #पुनर्वसन #जनशिक्षणसंस्थान #मानसिकप्रबोधन #जिल्हाधिकारी #अहिल्यानगरन्यूज #माणुसकी #युवाजागृती #Ahilyanagar #PrisonReform #Rehabilitation #PositiveVibes #SocialChange

Share

Other News

ताज्या बातम्या