थकबाकीदारांविरोधात महापालिकेने सुरू केली जप्तीची कारवाई;पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांचेमार्फत वसुली व जप्ती पथकांची स्थापणा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/02/2026 7:33 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून ०२ फेब्रुवारी पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चालु वर्षात पालिकेसाठी मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट १५१ कोटी रुपये ठेवण्यात आले आहे; परंतु जानेवारी अखेर केवळ ४३ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे.

त्याअनुषंगाने *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी वसुलीसाठी विशेष वसुली व जप्ती पथकांची स्थापणा केली असुन *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* यांना प्रत्येकी तीन-तीन क्षेत्रिय कार्यालयाचे नियंत्रण अधिकारी म्हणुन दि.३० जानेवारी रोजी आदेश निर्गमित केले आहेत. झोन निहाय स्थापित करण्यात आलेल्या पथकांमध्ये प्रत्येकी ८ ते ९ कर्मचाऱ्यांचा समावेश असुन त्यांच्यावर एका पथकप्रमुखाची नेमणुक करण्यात आलेली आहे.
 
मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थावर व जंगम मालमत्तांची जप्ती, नळ जोडणी व ड्रेनेज जोडणी खंडीत करुन पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहुन सार्वजनिक सुट्टयाच्या दिवशीसुध्दा वसुली काम करावयाचे  आहे त्याचप्रमाणे दैनंदिन केलेल्या कामाचा अहवाल महसुल विभागाचे *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्याकडे सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असुन सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांना कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.  

मालमत्ता कर व पाणी पट्टी थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत थकबाकीदारांना जप्ती नोटीस बजावण्यात येणार आहेत. नोटीस बजावल्यानंतरही जर संबंधित मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही, तर त्यांच्या मालमत्तांवर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेंतर्गत निवासी थकबाकीदारांची नळ व ड्रेनेज कनेक्शन खंडित करणे तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर थेट जप्ती अशी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

*अशोक नगर झोन अंतर्गत दोन दुकाने सील*
नांदेड वाघाळा शहर महापालिकेने कर संकलन मोहिमेला गती दिली असून, या कारवाईसाठी ०६ क्षेत्रिय कार्यालयांतील सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमे अंतर्गत दि.०२.०२.२०२६ रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.०२ अशोक नगर अंतर्गत *क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव* व त्यांच्या पथकाने हनुमानगड भागातील सरोजा नागनाथ सुन्नेवार मालमत्ता क्र.1-15-1105 व विमल नागनाथ सुन्नेवार मालमत्ता क्र.1,1-1105/2 या मालमत्ताधारका कडुन मालमत्ता करापोटी रु.१.०६ लक्ष एवढी थकबाकी असल्याने नोटीस देऊन सुध्दा कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याने संबंधीत मालमत्ता धारकांची दोन व्यावसायिक दुकाने सील करण्यात आली आहेत.

*चौकट*
नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. या कराच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व शिक्षण व्यवस्था सक्षमपणे राबवली जाते. वारंवार सूचना व नोटिसा देऊनही मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर नियमान्वये कारवाई करण्यात येईल.
- *डॉ.महेशकुमार डोईफोडे, आयुक्त, नांवाशमनपा,नांदेड*
 
*थकबाकीदारांची यादी केली जाणार प्रसिद्ध*
ज्या थकबाकीदारांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, अशा सर्व थकबाकीदारांची यादी महापालिकेमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित थकबाकीदारांकडून याबाबत करण्यात येणारी कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या