महानगरपालिका ‘ॲक्शन मोडवर : मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या दोन व्यावसायिक मालमत्ता जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/02/2026 7:15 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड शहरातील दोन व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे *आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या निर्देशानुसार *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* आणि *उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

वारंवार आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत, अशा थकबाकीदार मालमत्ताधारकांना कोणतीही सूट न देता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असून त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून जप्ती पथके स्थापन करण्यात आली आहेत. शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबविण्यात येत असून थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांच्या मालमत्तांना कर संकलन जप्ती पथकांनी भेटी देण्यास सुरुवात केली असून थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तांवर थेट सील व जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे.

*चौकट*
*दोन व्यावसायिक दुकाने जप्त*
वारंवार सूचना, नोटिसा देऊनही काही थकबाकीदारांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेत मंगळवारी तरोडा-सांगवी या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत *प्रविण नागनाथराव पालदेवार* यांच्याकडे रु.५.७१ लक्ष कर थकीत असल्याने तर शिवाजी नगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत *किशन मंगलाल गोकुळवाले* यांच्याकडे रु.९९.०९ हजार एवढी थकबाकी असल्याने त्यांची व्यावसायिक दुकाने सील करुन जप्त करण्यात आलेली असून कोणतीही सूट किंवा तडजोड न करता थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकबद्ध कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात असून थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती कारवाई टाळता येऊ शकेल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन *महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या