नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भांडारपाल व्यंकट गोविंदराव नागरगोजे हे विद्यापीठाच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर दि. ३१ जानेवारी, २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती (निरोप) समारंभ विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सत्कारमूर्ती व्यंकट नागरगोजे व त्यांची पत्नी सौ. आशा नागरगोजे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात मान्यवरांनी नागरगोजे यांच्या कार्यकाळाचा गौरव करताना, त्यांनी विद्यापीठातील भांडार विभागाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याचे नमूद केले. प्रशासनाशी समन्वय ठेवत त्यांनीजी दिलेली सेवा विद्यापीठासाठी मोलाची ठरली असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
नागरगोजे यांनी विद्यापीठात जवळपास २८ वर्षे भांडारपाल पदावर सेवा बजाववताना विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वैयक्तिक आणि सामाजिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले.