नांदेड :- नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त भारत 100 दिवस अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड शहरातील 16 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली.
सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संदीप फुले तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी तात्काळ संबंधित बालिकेच्या घरी भेट देऊन कारवाई केली. यावेळी बालिकेच्या आई व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच बालिकेच्या वयाची खातरजमा करून बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे पालकांना स्पष्टपणे समजावून सांगण्यात आले.
बालिकेच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने तिला बाल कल्याण समिती, नांदेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. तसेच पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले असून, या तत्पर कारवाईमुळे सदर बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला आहे.
बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यात अशा अनिष्ट प्रथा रोखता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.