अर्धापूर :- येथील लॉर्ड बसवेश्वरा प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे नुकतेच दिमाखात आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा आढावा आणि माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव असा दुहेरी संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडितराव लंगडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय टेंग्से यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत कराळे उपस्थित होते.
व्यासपीठावर नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, पाटील मॅडम, प्रा. रघुनाथ शेटे आणि मुख्याध्यापिका शैलजा शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मोबाईलच्या अतिवापराबाबत सतर्कतेचा इशारा
प्रमुख मार्गदर्शक विष्णुकांत कराळे यांनी पालकांशी संवाद साधताना मोबाईलच्या दुष्परिणामांवर भाष्य केले. "पालक आणि विद्यार्थी दोघांनीही मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या सवयींकडे बारकाईने लक्ष देणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
शाळेच्या प्रगतीचा आढावा
प्रास्ताविक करताना डॉ. रघुनाथ शेटे यांनी शाळेच्या १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. अजय टेंग्से यांनी शाळेच्या शिस्तीचे व उपक्रमांचे कौतुक केले, तर गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले यांनी शाळेच्या शैक्षणिक दर्जाची प्रशंसा केली.
गुणवंतांचा गौरव
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या जुन्या शाळेत पुन्हा आल्यामुळे माजी विद्यार्थी भावूक झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शैलजा शेटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कांबळे सर यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.