नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दत्ता मारुती खंदारे हे मंगळवार, दि. ३१ डिसेंबर, २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सेवागौरव समारंभाचे आयोजन विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात करण्यात आले होते. हा समारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ.
पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी
डॉ. भालचंद्र पराग, सत्कारमूर्ती डॉ. डी. एम. खंदारे तसेच सौ. रत्नमाला खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. खंदारे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे १५ वर्षे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात २२ वर्षे अशा एकूण ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत विविध शैक्षणिक व प्रशासकीय पदांवर कार्य करत उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक म्हणून दोन वेळा जबाबदारी सांभाळली असून,
विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखाधिकारी म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच शिक्षणशास्त्र संकुलात एम.पी.एड. समन्वयक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलात वाणिज्य व बिझनेस मॅनेजमेंट या विषयांचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले. सन २०२३ पासून ते विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. याशिवाय विद्यापीठ व इतर विविध विद्यापीठांमधील ज्ञान समिती, संलग्नीकरण समिती, ट्रिपल ए समिती आदी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सेवागौरव समारंभात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. डी. एम. खंदारे यांचा सपत्नीक स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित सहकारी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. खंदारे यांच्या
कार्यकर्तृत्वाबद्दल आपली मनोगते व्यक्त करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ. खंदारे यांनी विद्यापीठात विविध पदांवर केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रदीर्घ सेवेला उजाळा दिला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन
यांनी डॉ. खंदारे यांच्यासोबत कार्य करताना आलेले अनुभव विषद करत त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्तोत्र केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. या समारंभास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, डॉ. खंदारे यांचे कुटुंबीय तसेच
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.