नांदेड :- सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून सर्व कामांचे उद्दिष्टे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. या सभेस पर्यवेक्षाधीन आयएएस अनन्या रेड्डी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूर आंदेलवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चेन्ना, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, बांधकाम विभागाचे संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी, समाजकल्याण, आरोग्य, आयसीडीएस, लेखा, सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छ भारत मिशन आदी विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या कामांना मुदतवाढ देण्यात आली असून 30 मार्चपर्यंत हे अभियान गावस्तरावर राबवून सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संदर्भात सखोल आढावा घेताना ऑनलाइन घरकुल मंजुरीमध्ये मुखेड, लोहा, नायगाव, कंधार व किनवट हे तालुके मागे असल्याचे निदर्शनास आले. पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता वेळेत देण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून 10 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त (ODF Plus) करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या.