रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा नांदेडमध्ये शुभारंभ;अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/01/2026 6:55 PM

नांदेड :-दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालना मुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, निवासी वैद्यकीय अधिकारी गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले. त्यांनी देश, राज्य व जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी सादर करून अपघातांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली. तसेच नांदेड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ ते ३१ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला. यामध्ये मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ५.०४ टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अपघातांमधील मृत्यूसंख्या ही इतर गुन्ह्यांतील मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे सांगून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘रस्ते की पाठशाला’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक प्रदीप नन्नावरे यांनी “मी राष्ट्रीय महामार्ग बोलतोय” या विषयावर आधारित उद्बोधनात्मक गीताचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमास गुरू गोबिंदसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), नांदेड येथील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन वितरक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा एकूण २७५ नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केले, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या