ग्रामीण कलावंतांच्या सन्मानासाठी माळेगाव यात्रेत कला मंच- आमदार आनंदराव बोंढारकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/12/2025 4:54 PM

नांदेड :- ग्रामीण भागातील लोककलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी माळेगाव यात्रेत स्वतंत्र कला मंच उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन आमदार आनंदराव बोंढारकर यांनी केले.
यावर्षी माळेगाव यात्रेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाच्या समन्वयातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
       माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पारंपरिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी. बी. गिरी, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्यासह विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा काठी व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांनी केले. सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, अशोक मोरे, भाऊराव मोरे,उद्धव शिंदे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन परशुराम कौशल्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय देपांडे यांनी केले. पारंपारिक लोककला महोत्सवाला शाहीर प्रेम कुमार मस्के व अनुराधा नांदेडकर यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली.

*चौकट*  
*कलावंतांना घडवणारा मंच* 
*-प्रवीण पाटील चिखलीकर*

माळेगाव यात्रेत दरवर्षी पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते. या मंचावरून अनेक लोककलावंत घडले असून त्यांना ओळख आणि सन्मान मिळाला आहे. पारंपरिक लोककला जपण्याचे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य या महोत्सवातून होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.

चौकट
*जीवनगौरव पुरस्कार प्रदान*

कलाक्षेत्रात दीर्घकाळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने
श्रीमती आशाताई नरसिंग सुपलकर व शाहीर रमेश गिरी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल व पुष्पहार देऊन हा गौरव करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या