सांगली, दि. 23,
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025-26 मध्ये नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दि. 30 डिसेंबर 2025 आहे. राखीव प्रवर्गावर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारास / अर्जदारास जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करण्याकरिता गैरसोय होऊ नये याकरिता दि. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार- नाताळ सुट्टी) दि. 27 डिसेंबर 2025 (शनिवार ) व दि. 28 डिसेंबर 2025 (रविवार) या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम 2025- 26 जाहीर करण्यात आलेला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जदार/ उमेदवार यांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज https://ccvis.barti.in संकेतस्थळावर भरून निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचे शिफारस पत्र, 15 ए फॉर्मवर निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचा सही, शिक्का, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत व ऑनलाईन अर्ज कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावे. अर्जदार यांनी अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.