पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी माळेगाव यात्रा प्रेरणास्थान - आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/12/2025 2:58 PM

नांदेड :- श्रीक्षेत्र माळेगावची यात्रा ही जगातली आगळी-वेगळी यात्रा असून ती कृषी व पशुसंवर्धनासाठी विशेषतः प्रसिद्ध आहे. या यात्रेत दरवर्षी उत्कृष्ट दर्जाची पशुधन प्रदर्शने भरतात. यावर्षी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध पशु व दुग्ध स्पर्धांना शेतकरी व पशुपालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी स्पर्धांच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्यात आली असल्याचे सांगत, पूर्वीप्रमाणे माळेगाव यात्रेत घोडा, गाढव व उंट यांच्या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली. 
     आज माळेगाव येथे आयोजित कार्यक्रमात विविध पशु व दुग्ध स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
      कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी.बी. गिरी, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, दत्ता वाले, रोहित पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, डॉ. प्रवीणकुमार घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
       माळेगावची यात्रा अधिक व्यापक स्वरूपात वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असून, यावर्षी जिल्हा परिषदेने अचूक नियोजन केल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. पुढील वर्षी दुग्ध व्यवसायात वाढ व्हावी तसेच शेतकऱ्यांना जोडधंद्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध खाजगी दूध डेऱ्यांचा सहभाग घेतला जाणार असल्याचेही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केले. यावेळी लाल कंधारी व देवणी नर-मादी गटाचे चॅम्पियन तसेच विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
       दुग्ध स्पर्धेसाठी नमस्कार दूध डेअरी, मस्कटी दूध डेअरी व एपीएस दूध डेअरी यांनी पुढाकार घेतला. यासाठी संग्राम गाडेकर, नितीन शिंदे व सतीश कोगनळे यांनी विशेष सहकार्य करत दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

चौकट 
पशुधनाचे शास्त्रशुद्ध संगोपन करावे- जिल्हाधिकारी कर्डिले

शेती क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी पशुधनांची संख्या कमी होत चालली आहे.पशुपालकांनी पशुधनांची संख्या वाढवून त्यांच्या आरोग्याची योग्य निगा राखावी व शास्त्रशुद्ध संगोपन करावे. दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून अशा यात्रांमधून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळते, असे मत यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले

Share

Other News

ताज्या बातम्या