प्रथम घटक चाचणी परीक्षेची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी;शालेय परीक्षा व्यवस्था व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/08/2026 6:24 AM

अर्धापूर :- दि. २० ऑगस्ट  श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित, नांदेड येथील श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे सुरू असलेल्या प्रथम घटक चाचणी परीक्षेची अर्धापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. लोकडोदाजी गोडबोले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
   यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. गोडबोले यांनी शाळेतील विविध परीक्षा कक्षांना भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आसन व्यवस्था, परीक्षा कक्षातील शिस्त, शांत व तणावमुक्त वातावरण, पर्यवेक्षण व्यवस्था तसेच परीक्षेचे नियोजन यांची बारकाईने पाहणी केली. विद्यार्थी अत्यंत शांत, शिस्तबद्ध व एकाग्रतेने परीक्षा देत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
   प्रथम घटक चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अध्ययन, विषयाचे आकलन, ज्ञानाची पातळी व शैक्षणिक प्रगती तपासली जात असून, त्यादृष्टीने शाळेने केलेले नियोजन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही त्रास अथवा मानसिक ताण न येता परीक्षेला सामोरे जाता यावे, यासाठी शाळेने केलेल्या व्यवस्थेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
   पाहणीनंतर शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्री. लोकडोदाजी गोडबोले यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर चर्चा झाली. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच शालेय कामकाजातील नियोजनबद्धतेचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
   या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. अरुण कल्याणकर, श्री. गुलाबराव मदने, श्री. आर. एस. खांडरे व श्री. पी. एस. तेलंग यांची उपस्थिती होती.
   प्रथम घटक चाचणीचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी ज्येष्ठ शिक्षक ए. आर. सवडकर, एस. एस. डोईबोळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, पी. एन. कदम, ए. व्ही. कदम, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडित, व्ही. डी. काळे व एन. पी. केरूरकर हे शिक्षक पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत.
    गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, शैक्षणिक गुणवत्ता, परीक्षा शिस्त आणि नियोजनबद्ध कामकाजाला आणखी चालना मिळाली आहे. शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने शाळेचे सुरू असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

Share

Other News

ताज्या बातम्या