सांगली, दि. १९ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाव्यापी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सयाजी हॉटेल, विश्रामबाग येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो विश्रामबाग येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर धडकणार असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी केली.
सांगली जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. तसेच वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रश्नाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांपासून स्मार्ट मीटरचा प्रश्न जिल्ह्यासह राज्यभर चर्चेत असून, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधीक्षक अभियंता, वीज वितरण विभाग, सांगली यांच्या कार्यालयावर निघणाऱ्या या मोर्चात सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंदनदादा चव्हाण यांनी केले आहे.
प्रमुख मागण्या
स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करावी.
वाढीव वीज बिलांची चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा.
सर्वसामान्यांना परवडणारे वीज दर लागू करावेत.
ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
जनतेवरील आर्थिक भार व अन्यायकारक वीज आकारणी तात्काळ थांबवावी.
“स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी हा निर्णायक लढा असून, जिल्ह्यातील प्रत्येक वीज ग्राहकाने विराट मोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन चंदनदादा चव्हाण यांनी केले.
मा. चंदनदादा चव्हाण, डॉ. अब्दुल मन्नान शेख, श्री. नितीन मिरजकर, श्री. युनुस महात, श्री. सलीम पन्हाळकर, श्री. दत्ता पाटील, श्री. अरुण रुपनर, श्री. रामदास सावंत, श्री. प्रणव पाटील, डॉ. जयपाल चौगुले, श्री. गोरख व्हनखंडे, श्री. सुरेंद्र गायकवाड, श्री. टीपू इनामदार, श्री. सुभाष तोडकर, श्री. बापू अवघडे, श्री. रामभाऊ पाटील, श्री. विजय बल्लारी, श्री. महेश मासाळ, श्री. हुसेन शेख, श्री. आदर्श नलवडे, श्री. अमोल माने, श्री. सतीश फोंडे, श्री. अक्षय पवार उपस्थित होते.