नांदेड जिल्ह्यात केळीच्या दरात मोठी घसरण;शेतकरी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; दर नियंत्रणासाठी स्वतंत्र समितीची मागणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/07/2026 6:15 PM

नांदेड : जूनमध्ये ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेला केळीचा दर जुलैअखेर थेट ११०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याने नांदेड जिल्हा व परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभावात झालेली अनैसर्गिक घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर संकट ठरली आहे. या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन दर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यात उच्च प्रतीच्या केळीला ३१०० रुपये, तर सामान्य केळीला २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. परंतु मागच्या काही दिवसांपासून केळी दरात १५०० ते १६०० रुपयांची घसरण झाली. सध्या उच्च दर्जाच्या केळीला सुमारे १८०० रुपये, तर कमी दर्जाच्या मालाला ११०० रुपये दर मिळत आहे. डोंगरकडा परिसरात तर काही शेतकऱ्यांकडून अवघ्या ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू असल्याची माहिती येथील शेतकरी पंकज अडकीने यांनी दिली.

केळीच्या दरातील घसरणीसोबतच कमिशन, पत्तीच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट, वजनातील तफावत, वाहतूक आणि अन्य छुप्या खर्चाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  शेतकरी शिष्टमंडळाने संदर्भीय पत्र निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे सुपुर्द केले. यानंतर एक महत्वपूर्ण बैठक आटोपून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हनुमंत राजेगोरे व अन्य काही प्रतिनिधीशी चर्चा केली असता त्यावर लवकरच योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आज मिळेल त्या दराने केळी विकण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून केळीचे नैसर्गिक दर व्यापाऱ्यांकडून पाडले जात आहेत असा आरोप केळी पिकाचे अभ्यासक प्रा. संदिपकुमार देशमुख यांनी केला आहे. खत, कीटकनाशके, मजुरी आणि अन्य निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दरातील ही घसरण शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत असल्याचा मत काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी व्यक्त केले. 

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख, केळी अभ्यासक प्रा. संदीपकुमार देशमुख यांच्यासह डॉ. प्रसाद वानखेडे, प्रल्हादराव साळुंके, बाळू पाटील शनीकर, पंकज अडकीने, बालाजी हेंद्रे, रामजी पाटील शिंदे, संदीप तरोडेकर, भास्कर पाटील, दत्तराव लहानकर, माधव बिचेवार, सुनील देशमुख, आनंदा राजेवार आदी शेतकरी उपस्थित होते.


चौकट: 

गेल्या अनेक वर्षांपासून केळीच्या नैसर्गिक दरापासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. मूळ नैसर्गिक दर आणि व्यापाऱ्यांनी मनमानी करून ठरवलेला दर वेगळा असतो. बीजक आणि टपाल अवाजवी खर्च आहे. तो शेतकऱ्यांच्या बोकांडी मारला जातो. पत्ती न मोजता लावून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जाते. या सर्व प्रश्न संबंधी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या