कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी कोणतेही शुल्क देऊ नका; पैसे घेतल्यास सेवा केंद्रांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 27/07/2026 6:40 AM

कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी कोणतेही शुल्क देऊ नका; पैसे घेतल्यास सेवा केंद्रांवर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया


अहिल्यानगर | प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी 'आपले सरकार सेवा केंद्र' येथे जाऊन आधार प्रमाणीकरण (e-KYC) करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना स्पष्ट निर्देश दिले असून, e-KYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. कोणत्याही केंद्रचालकाने आधार प्रमाणीकरणासाठी पैसे मागितल्यास किंवा शुल्क आकारल्याचे आढळून आल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी e-KYC ही प्रक्रिया अनिवार्य असल्याने अनेक शेतकरी सेवा केंद्रांवर गर्दी करत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, e-KYC करताना कोणालाही पैसे देऊ नयेत. जर कोणत्याही सेवा केंद्रावर शुल्काची मागणी करण्यात आली, तर संबंधित महसूल प्रशासन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाकडे तातडीने तक्रार नोंदवावी.

जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत e-KYC पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच ही माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही, यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या